Wednesday, 29 August 2012

जिंकतो तोच

नांगराचा फाळ निष्ठुरपणे
मातीचा उर चिरत जातो
मोकळ्या ढाकळ्या त्या तनुत
मग हिरवागार कोंब फुलतो

टाकीचे मस्तकावरील घाव
दगड किती निर्धाराने सोसतो
तुकडे कपचे पडत त्याला
ईश्वराचा  आकार येतो


अस्तित्वावर होणा-या घाल्यांनी
अभिमान राख राख होतो
त्या सत्वहीन राखेतुनच पण
फिनिक्स  नवी भरारी घेतो

नवनवे आघात पचवूनच
मनास एक कणखरपणा  येतो 
अडचणींचे डोंगर खोदुनच
मनगटात नवा जोश येतो

या  संकटांनी मग तुही
कशाला खचून जातो
' जिंकतो तोच ' नव्या उमेदीने
काळाशी जो टक्कर देतो


            -सुहास भुसे
       







Sunday, 26 August 2012

धमालपुरची शाळा भाग-२


धमालपुरची शाळा भाग -२ 
माझ्या इद्यार्थी मित्रांनो,
या लेखमालेत आपण धमालपुरच्या शाळेतील काही नमुनेदार इद्यार्थ्यांचे मासलेवाईक किस्से पाहत आहोत..आणि आजचा आपला इद्यार्थी आहे ...
       २) विजय ढेरे.
.
       इजू बद्दल बोलावे तेवढे थोडे आहे. लहानपणापासून अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टींत झळकणारे एक छंदी-फंदी व्यक्तिमत्व. कोणती विद्यार्थिनी कोठे राहते तिचा पत्ता अशा तपशीलांनी भरलेली याची वही एकदा मला सापडली तेव्हा मी याची जाम धुलाई केलि होती.
लहान असताना इजू अतिशय डेअरिंगबाज होता. पण हल्ली त्याची बायको त्याचे फार हाल करते असे ऐकून आहे. परवा शिवाजी (वाघमारे) सांगत होता विजूचा एक किस्सा.

      एकदा आपल्या दारुड्या मित्रांचे ( कोण मित्र ते सांगत नाही आपण ओळखून घ्या ) ऐकून विजुने जिवावरचे धाडस केले.
विजू(बायकोला) : काय ग ये ....फार झाल तुझ नाटक ....आजपासून तू सर्व भांडी धुवायची ..धूण धुवायचं ...उत्तम स्वयंपाक करून मला जेवायला वाढायचं ...माझ्या कपड्यांना कडक इस्त्री करून ठेवायची ...काय ग ये समजल का नाही ....आज मला योगेश देवकर च्या पार्टीला जायचं आहे ...सांग बर मग माझ्या बुटाला pa^laISa कोण करणार ..?
बायको : ते मी सांगते सर्व ...पण आधी तुम्ही पलंगाच्या बाहेर तर या

ख्या ख्या ख्या
या माझ्या हसण्यातून माझी माझ्या या माजी इद्यार्थ्याविषयीची सहानभूती जाणवलीच असेल ..

..
तर आता शाळेतला एक किस्सा सांगतो.
एकदा आमचे ग शी साहेब शाळा तपासणीला आले होते ....आले ते थेट आमच्या ५ वीच्या वर्गात ....
ग शी : विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारेन
इजू नेहमी मागच्या बाकावर बसून गोंधळ घालत असे ...आजही त्याची टंगळ मंगळ सुरूच होती ते पाहून साहेबांनी त्यालाच आधी उभे केले.
ग.शी. : ह बाळा तू मला कोणत्याही ५ प्राण्यांची नावे सांग बर .....
विजय : दोन हत्ती आणि तीन सिंह ..





       

धमालपुरची शाळा- भाग १


                    धमालपुरची शाळा- भाग १



हुश्श्य ..!!
अहो वात आणलाय या कार्ट्यांनी ...!!
आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हो ...
अहो इतके नाठाळ आणि टवाळ विद्यार्थी जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्या शाळेत नसतील.
शाळेत गुरुजींना आणि घरी पालकांना अगदी नाकी नउ आणले आहेत यांनी..
या लेखमालेतून म्हटल या पोरांचे काही नमुनेदार आणि मासलेदार किस्से तुम्हाला सांगावेत.....वाचा आणि या उनाड पोरांना कसे ताळ्यावर आणायचे याचा काही मार्ग सुचला तर आम्हाला सांगा.
..
..
१)      विध्यार्थी :- अनिल काळे .

  हा एक जुना विद्यार्थी आहे. बरीच वर्षे एकेका वर्गात काढून त्याने आपले शाळेवरचे प्रेम सिद्ध केले होते. सध्या दहावीत ५ वेळा नापास झाल्यानंतर स्वत: ची चहाची टपरी याने सुरु केलि आहे . पण त्यातला किमान ५० कप चहा तरी रोज स्वत: च पितो अशी वदंता आहे.

      याचा एक किस्सा सांगतो. अनिलला एकदा मधल्या सुट्टीत ग्राउंड वर कुल्फी विकणाऱ्या फेरीवाल्याने पकडून माझ्याकडे आणले. आता याने काय नवीन खोडी केलि म्हणून त्याच्याकडे चौकशी केलि असता त्याने जी हकीकत पुढीलप्रमाणे..

      अनिल सुट्टीत कुल्फिवाल्याकडे गेला .
      त्याने मोजून ५ कुल्फ्या खाल्ल्या.
      फेरीवाला म्हटला बर आहे.
      चांगल गिऱ्हाईक आहे.
      हातोहात चांगला धंदा झाला
      अनिल ने ऐटीत कुल्फ्या खाल्या आणि तसाच ऐटीत तो पुढे निघाला.
      त्यावर कुल्फिवाल्याने त्याला थांबवले आणि विचारले,
      अरे पैसे कोण देणार ?
      त्यावर अनिलने जे मासलेवाईक उत्तर दिले त्यावरून तुम्हाला कळेल कि आमच्या शाळेतली पोर कशी नमुनेदार आहेत ते ..

      अनिल त्याला म्हणाला,
      कसले पैसे ?
      कुल्फीवाला म्हणाला,
      अरे तू ५ कुल्फ्या खाल्या नां, त्याचे पैसे ..
      त्यावर अनिल म्हणाला ऐटीत
पैसे बैसे काही मिळणार नाहीत. माझ्या आईने सांगितलंय खायचा प्यायचा काहीही लाड चालेल पैश्याचा लाड अजिबात चालणार नाही.





धमालपुरातली पोर हुशार


धमालपूर .....
आंतरजालातील थोबाडपुस्तिकेवर आमचा चंचूप्रवेश झाला होता नुकताच तेव्हा आम्ही या गावाचे नागरिक झालो. तेव्हा नवीन होतो. हे सर्व काल्पनिक आहे याची जाणीव होती. इथ खूप वल्ली भेटल्या. अनेकांशी मैत्रीचे घट्ट धागे गुंफले गेले. या गावात आल्यावर या वैशिष्ट्यपूर्ण मंडळींच्या सहवासात वेळ कसा जातो हे कळत देखील नाही. हळू हळू हे संदर्भ बदलत गेले . हे काल्पनिक आहे हि जाणीव पुसट होत गेली. मग विजय ढेरेचा धाबा खराच वाटायला लागला. अनिल भाऊंच्या टपरीत रोज संध्याकाळी चहा प्यायला जाण्याची तल्लफ होऊ लागली. लीना, राधा चे न्याहरी ..जेवणासाठी येणारे पदार्थ देखील चाखून पहावेसे वाटू लागले.शिवाजी,  योगेश, सारंग , विश्वनाथ, ऋषिका, अपर्णा, किशा, राधा हि मंडळी खर् या आयुष्यातल्या मित्रांइतकीच जवळची वाटत आहेत.आणि आज हि स्थिती आहे कि आमचे खरे गाव औंढी कि धमालपूर या विषयी आम्ही संभ्रमात आहोत.
..
आमची हि कविता त्या धमाल गावास 
त्या धमालपुरास अर्पण.............!!
( टीप: ज्यांनी धमालपुरातली मजा अनुभवली आहे त्यांनाच या कवितेची मजा कळेल. बाकीच्यांना हि निव्वळ बडबडगीत वाटण्याचीच शक्यता आहे )

एक.... दोन.... तीन.... चार
धमालपुरातली पोर हुशार
एकापेक्षा एक नमुने त्यांचे
सांगेन तुम्हाला किस्से चार

विजय अनिल दुक्कल छान
आहेत मोठी अक्कलवान
गनिमी काव्यात यांची ख्याती
वरून मात्र सभ्य अन गरीब म्हणविती

किशाने काढले दारूचे दुकान
योगेश म्हणे एक बाटली आण
दोघेही पिऊन असतात तंग
पेशंटच यांच्या भल करो पांडुरंग

धमालपुरातला बहुरूपी गीते
बेन रोज एक नवे खाते बनविते
धमालपुरातला कृष्ण ओळखा
शिवाजीच्या मागे पोरींचा घोळका

लीनाला आवडते खाणे आणि गाणे
पोरीच्या या काही ठीक नाहीत लक्षणे
सारंग-विश्वा गप्पांना रंग आणतात 
पण आवसेला गेलेले पुनवेलाच उगवतात

उगवत्या कवयित्री अपर्णा ऋषिका
श्रोते म्हणतात यांचे माका-नाका माका-नाका
कवितांनी यांच्या झीट आणली गावाला
धडेच ते कविता म्हणायच्या नावाला

सुहास गुरुजी बिचारे साधे भोळे
वैतागून गेलेत या कार्ट्यामुळे
त्यांची न म्याडमची भिडवत असतात खाती
धमालपुरातली पोर फार करामती



                                सुहास भुसे
(२६-०८-२०१२)


Thursday, 23 August 2012

उद्वेग

कोण कोणासाठी जगत इथ
कुणाच कुणाशी निभत इथ
मग्न स्वत:तच चुर सारे
कोण कुणाला जपत इथ



वासनांचा बाजार मांडून बसलेले
प्रेमाचे लबाड पुजारी
नात्यांची वखार थाटून बसलेले
भावनांचे घाऊक व्यापारी
घ्वावे तेव्हा द्यावे ऐसा शुद्ध व्यवहार
उधार मग कोण कोणाकडे ठेवत इथ

मग्न स्वत:तच चुर सारे
कोण कुणाला जपत इथ

कोणी करत कोण भरत
कोणी विस्कटत कोण सावरत
मुखवटे आणि चेहरे यांचे द्वंद्व
कोणी फसवत कोण फसत
कोणी हरत कोण जिंकत इथ

मग्न स्वत:तच चुर सारे
कोण कुणाला जपत इथ



                                         ( सुहास भुसे )
                                        






Wednesday, 22 August 2012

चारोळ्या-३


प्राजक्त फुलांची उपमा
तुला चपलख दिलेली
माझ्या प्रेमाची उबही
तुला सहन न झालेली

मोरपीस रोजनिशीतल
 आठवणींचा दुवा आहे
 तिच्या स्मृतींचा मनात
 घुमणारा मधुर पावा आहे

भिजले तन भिजले मन
भिजले अवघे यौवन
प्रीतीच्या श्रावणात तुझ्या
चिंब चिंब झाले जीवन

कवितांचे सृजन आहे
थबथबलेल्या मनात
भावनांची शिंपण आहे
            या ब्लॉगच्या पानापानात ...




सुहास भुसे.
( २२-८-२०१२)










Monday, 20 August 2012

गल्लीतला शेर तो




गल्लीतला शेर तो
पोरांसमोर ' डिंगा '  मारायचा,
त्याची मोठी ग्यांग होती
गावातही त्याचा 'वट ' असायचा.

कोणाच्या बापाला तो
कधी नाही भ्यायचा.
संकटात, अगदी ' कोपच्यातही '
तो बेडर बिनधास्त असायचा.








एका गोड पोरीवर तो
मनापासून मरायचा.
तिला पाहताच त्याचा
हार्ट थडा थडा उडायचा.






बोलण्यात मोठा चतुर,
चर्चेतही कधी नाही हरायचा.
'ती ' समोर येताच मात्र
त-त प-प करायचा.


 तिने एक नजर फेकताच
याचा बलदंड देह थरकायचा.
गल्लीतला शेर तो
तिच्यापुढे कसा बिल्ली व्हायचा..


                                        सुहास भुसे
                                    




   

Thursday, 16 August 2012

चारोळ्या - १

अंधार दाटला आहे सर्वत्र
जीवनाचा अर्थच बदललाय तमाम
हवी आहे पुन्हा एकदा
एक नवी सुरवात, एक नवा आयाम


वसुचे चुंबन घ्याया 
रवी जरा उतरला खाली 
मावळतीवर बिंबित झाली 
धरेच्या गालावरची लाली 


तू दिलेला प्रत्येक घाव 
जिव्हारी बसला होता 
उमटलेल्या वेदनेने 
तुला दुवाच दिला होता 


चार शब्द लिहिले तुजविषयी
चार शब्द लिहिले मजविषयी
तुझे- माझे जगावेगळे प्रेम
चार ओळी त्या प्रेमाविषयी


सुहास भुसे.
(१६-०८-२०१२)


 

चारोळ्या - २

ओथंबल आभाळ, आसमंत टपटपला 
हरखली धरा, मृदगंध घमघमला 
हरेल तृष्णा, चातक चिवचिवला 
तृप्ताया मनास, श्रावण बरसला. 


रात्रीच्या विराण आकाशाची विराणी
माझ्या ओठांतून गात असते
तू दिलेल्या जखमांची वेदना
माझ्या डोळ्यांतून अनावर वाहत असते.


तिच्या रंगात असा रंगलो
मी माझा राहिलोच नाही
अणूरेणुवर तिचे स्वामित्व 
"मी तिचा"बस दुसरी जाणीवच नाही. 





माझ्या प्रेमानेच 
तिला रूप दिले 
प्रेम दवांत न्हाऊन 
कळीचे एका फुल झाले


सुहास भुसे.

(०४-०७-२००९) 

Wednesday, 15 August 2012

ती चंचला

गात्र गात्रे माझी न्हाउनी त्यात निघती
दोन्ही कर त्या चंचलेचे प्रेम असे उधळती.

डोळ्याला भिडवत डोळा मान अशी झटकते ती
मागे सारलेल्या अवखळ बटा पुन्हा भालावर ढळती.

तिचे नयन जीवनाच्या सौंदर्याची जाणीव करून देती
अंधाऱ्या निरव रात्रीतली ती मौतीक्के तेजाळती.

प्राजक्त फुलांचा गजरा माळलेली तिपेडी वेणी
सोनेरी उन्हातली काळी नागीण जशी वळवळती.

मिटल्या डोळ्यांस तिच्या आगमाची वार्ता देती
संगीतात न्हाती, छुमछुमती तिची पैंजणे सळसळती.

तिच  हसण, मृदू, सुंदर अन अस निरागस
माझा राग,  माझे रुसवे आपसूक त्यात पाघळती.

तिच बोलण अस निष्पाप, माझ्या लटक्या तक्रारी विरघळती
किनार् यावरची वाळू धुवून नेणारी लाट जशी फेसाळती.

हि कोण सुंदरा, मृगनयना, कोण ही चंचला
माझ्या काळजातली अत्तराची कुपी ती दरवळती.. 

                             सुहास भुसे.

                           

हृदयगत

'प्रेम' .......माणसाच्या जीवनातला सर्वात तरल भावनाविष्कार. ' प्रेम ' प्रत्येकजण आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या वळणावर करतोच करतो. प्रेम म्हणजे वेदना, प्रेम म्हणजे दु:ख, अस सगळेच म्हणतात. तरी सगळेच जण प्रेम करतात. प्रेम हा त्या अर्थाने सार्वत्रिक स्वरूपाचा भावनाविष्कार आहे.

हृदयाच्या पायथ्याशी 
वेदनेचा गाव आहे 
जीव घेणाऱ्या वेदनेला 
प्रेम असे नाव आहे 

         अस हे प्रेम जेव्हा एखाद्याला होत तेव्हा त्याच्यात अंतरबाह्य परिवर्तन होत, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. नेहमीच पाहतो ती फुले, संध्याकाळ, मावळतीचे सूर्यबिंब, चंद्र, चांदण्या त्याला अचानक वेगळ्या वाटायला लागतात. पूर्वी जी गाणी तो कानाने नुसती ऐकत असतो ती आता त्याच्या काळजात घुसू लागतात. अचानक ' तिच्या ' शिवाय किंवा ' त्याच्या ' शिवाय सर्व काही निरस वाटायला लागते. अगदी भर गर्दीत त्याला एकट एकट वाटायला लागत.......

                                                      तिच्या रंगात असा रंगलो 
                                                      मी माझा राहिलोच नाही 
                                                      तिचे स्वामित्व माझ्या अणू-रेणू वर  
                                                      मी तिचा, बस दुसरी जाणीवच नाही 

         अशी त्याची स्थिती होते. आणि जेव्हा तो या प्रेमात एका विशिष्ट अशा पातळीवर येउन पोहचतो, अगदी पूर्णपणे त्या प्रेमाविष्कारात  चिंब न्हाउन निघतो, त्याच्या हृदयातील भावनाउद्रेक पराकोटीला जावून पोहचतो, तेव्हा तो कविता करू लागतो.

         त्याच अतिशय हळव झालेलं मन प्रत्येक गोष्टीकडे एका तरल काव्यात्म दृष्टीने पाहू लागत. मग तिचे डोळे ' झील '  किंवा ' मय के प्याले भरे हुए ' वाटायला लागतात. तिचे गळ्यात पडणारे हात ' चांदण्याचे हात ' वाटायला लागतात. ' फुले लाजरी ' बघून त्याला तिचे ' हळवे ओठ' स्मरतात. दारातल्या मोगर्याचा हवेवर स्वर होवून येणारा सुगंध त्याला तिच्या केसांचा सुगंधाची आठवण करून देतो. आणि तो एका वेगळ्याच कल्पनाविश्वात हरवून जातो.

         आणि अशा नाजूक अवस्थेत जर विरह वाट्याला आला तर ......

         त्या दर्द , त्याची वेदना असा आर्त हुंकार भरते कि आपसूक त्याची कविता बनते. " Poetry is a spontaneous overflow of powerful feeling's...!! "  अस विल्यम वर्डस्वर्थ म्हणतो ते उगाच नव्हे !!       

भरून आलेले मेघ

भरून आलेले मेघ

भरून आलेले मेघ
ही पावसाळी हवा
सोसाट्याचा वारा
अन बोचणारा गारवा..

मोरांचा नाच, कोकिळेचे कुंजन
अन घुमणारा पारवा
हि चाहूल कशाची ?
ऋतू येत आहे नवा..

निसर्ग उत्फुल्ल आहे
बहराच्या जाणीवेनं
आसमंत सारा
भरला आहे प्रेमानं ..

या सौंदर्याचा, या जाणीवांचा
आस्वाद घ्यावा प्रियतमेच्या साक्षीनं
तू कुठे आहे अशा वेळी
मन व्याकुळ विरहानं..

भरून आलेले मेघ
आवेगानं ओसंडतील
काळीज फाडून त्यांचे
जलधारा बरसतील..

मनसोक्त त्या वर्षावात
प्रेमासक्त मने चिंब होतील
प्रेमधारा झेलावया मजसवे
परी तू मात्र नसशील..

                                                        -सुहास भुसे
                           

सुखाचा शोध

 माणसाचे जीवन म्हणजे अनादी अनंत दु:खाची गाथा असे अनेक तत्वज्ञ, संतांचे मत असते. प्रपंच, संसार आणि एकूणच अवघे जग म्हणजे भवसागर, हा भवसागर प्रत्येक मनुष्य प्राण्याला पार करावाच लागतो, आणि तो एक अतिशय वेदनामय अनुभव असतो. आणि यासाठीच अनेक संत तत्वज्ञ मुक्ती हे आपल्या साधनेचे, जीवनाचे अंतिम ध्येय मानतात आणि त्यासाठी प्रयत्नशील राहतात. मुक्ती या दु:खातून, या वेदनामय जगण्यातून, या मनुष्य जन्मातून आणि ८४ लक्ष योनींच्या प्रवासातून. तथापि या सर्वात आमच्या तुकाराम महाराजांचा एक अभंग मात्र अतिशय वेगळा आणि म्हणूनच उठून दिसणारा ...

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी

न लगे मुक्ती आम्हास पुन्हा पुन्हा हा मनुष्य जन्म दिलास तरी काही हरकत नाही नव्हे त्यातच आमचे सौख्य सामावले आहे. अर्थात या अभंगाचा संदर्भ वेगळा आहे. तरी तुकाराम मुक्ती लाथाडून मनुष्य जन्मच पुन्हा पुन्हा मागतात इतकेच महत्वाचे.

खरच का माणसाचे जीवन इतके दु:खाने भरले आहे ? यासंदर्भात एक दृष्टांत प्रसिद्ध आणि माझा फार आवडता आहे. एकदा एक शिक्षक वर्गात एक प्रयोग करतात. वर्गात आल्याआल्या फळ्यावर एक कागद टांगतात. पांढर्या शुभ्र कागदावर मध्यभागी एक छोटासा काळा ठिपका असतो. आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याला उठवून प्रश्न विचारतात, सांग बर बाळ, तुला काय दिसतेय समोर जवळ जवळ अख्ख्या वर्गाला उठवून हा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येकाचे उत्तर एकच असते.गुरुजी आम्हाला एक काळा ठिपका दिसतोय. शिक्षक त्यावर उत्तरतात, बाळांनो हा इतका मोठा पांढराशुभ्र कागद तुम्हाला कोणालाच दिसला नाही आणि सर्वांना फक्त काळा ठिपकाच तेवढा दिसला. जीवनाचे देखील असेच असते बाळांनो. या भल्या मोठ्या कागदासारखे त्यात सुख पसरलेले असते. तथापि ते कोणाला दिसत नाही आणि हा दु:ख काळा ठिपका मात्र प्रत्येकाला प्रकर्षाने दिसतो. बाळांनो म्हणून दु:ख कवटाळून बसू नका. सुख पहा ...कटाक्षाने ......

अतिशय बोलके आणि सुंदर उदाहरण आहे. माणसाच्या जीवनावर मोठ्या मोठ्या तत्वज्ञानपर लेखांनी प्रकाश पडणार नाही पण या छोट्याश्या उदाहरणात जीवनाचे सार सामावले आहे. दु:खांचा बाऊ करू नका, त्यांना सामोरे जा. दु:ख भोगणे मराठी भाषेतला हा वाक्प्रचार मला फार आवडतो. भोगणे ...उपभोग घेणे ...या भाषेत आणि या संस्कृतीत दु:ख हि देखील एक भोगण्याची चीज आहे. त्यामुळे त्याला कितपत महत्व द्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे.

सुख हे शोधावे लागत नाही. ते असतेच , आजूबाजूला पसरलेले असते...भल्या पहाटे मोहक गुलाबावर दवबिंदू बनून ते चमकत असते. कोवळ्या उन्हात नवी तकाकी ल्यायलेल्या हिरवाळीच्या रुपाने ते डोलत असते. तापलेल्या धरित्रीची तृष्णा शांत करणार्या थबथबलेल्या ढगांतून कोसळणार्या पावसाच्या रुपाने ते बरसत असते. हिरव्यागार झाडीतून वाहणारया खळाळत्या प्रपातातून ते वाहत असते. प्रसन्न सकाळ, अंगणात टाकलेला सडा, हलकीशी रांगोळी, स्वस्तिक आणि तुळशीला फेरी घालणारी सुवासिनी अशा प्रतिकांतून ते बोलत असत. माळावरील वाटांवरून चालताना छोट्या छोट्या गवतफुलांतून ते खुणावत असत. भावनांचा कल्लोळ करणाऱ्या कवितांतून ते आपल्याशी गुज साधत असत. आणखी एखाद्या दर्जेदार साहित्यकृतीतून ते संवाद साधत असत. बिस्मिल्लाची शहनाई, रवीशंकरांची सतार बनून ते आपल्या हृदयाच्या तारा छेडत असत. माणिक वर्मांचा मालकंस, पंडित भीमसेन जोशींची भैरवी बनून ते आपल्या कानात कोसळत असत. इतक विश्वव्यापक आणि सर्वसमावेशक अस हे सुख असत.
मित्रांनो, माणसाच्या जन्माला येऊन जर काही मिळवायचं असेल जर काही कमवायच असेल ते तर ते म्हणजे हे सुख पाहण्याची ती दिव्यदृष्टी , ती रसिकता. आपल्या भोवताली छोट्या छोट्या गोष्टींत विखुरलेले हे सुख पाहायला शिका. तुमच जीवन एक भवसागर राहणार नाही तर ती एक नितांतरमणीय जीवनसरिता बनेल. आणि मग बघा तुमच आयुष्य दु:खाच नामोनिशान नसणारी  एक आनंद यात्राच बनून जाईल. 

                                                      सुहास भुसे
                                               (१४-८-२०१२)

                                           

कायम विनाअनुदानित शाळांना कोणी वाली आहे का नाही ??

                            महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून एके काळी प्रगतीपथावर होते. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र , टिळक गोखले आगरकरांचा महाराष्ट्र कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळेंचा महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची ओळख होती. शिक्षणाची गंगोत्री हि या प्रगतीचा पाया होती. पण शिक्षण क्षेत्रात आज माजलेली बजबजपुरी पाहता " हेची फळ काय मम तपाला ?? " अस म्हणत हे महापुरुष  डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाहीत.
            या शिक्षणाच्या खेळखंडोबातला ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे कायम विनाअनुदानित शाळांचा प्रश्न.

मुळात या निर्णयाचा पायाच इतका तकलादू आहे कि या निर्णयाचे तात्विक, प्रशासकीय, सामाजिक वा माणुसकीच्या ....अशा कोणत्याच दृष्टीकोनातून समर्थन करता येत नाही. राज्यभरात सुमारे ४५०० शाळा आणि ५५००० शिक्षक या शासनाच्या जुलमी निर्णयाच्या खाईत होरपळत आहेत. एखाद्याचे श्रम फुकट घेववतात तरी कसे या निर्दयांना ? आणि मग आपल्या समाजात श्रमप्रतिष्ठा राहिली नाही म्हणून बोंब मारायचा काय अधिकार या समाज धुरिणांना ?
    
             शिक्षणक्षेत्र हे अनुत्पादित क्षेत्र आहे असे शासनाचे मत हा या निर्णयाचा पाया आहे. आगस्ट २००२ च्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तत्कालिक प्रशासकांच्या किंवा त्यांना असा बद्सल्ला देणार्या त्यांच्या सल्लागारांची कीव करावी तेवढी थोडी आहे. शिक्षण क्षेत्र हे अनुत्पादित क्षेत्र आहे म्हणता मग शिक्षण करापोटी वर्षाला हजारो कोटींची रक्कम वसूल करून तीजोर्या भरता त्या कशा ? आणि इथल्या कारखान्यांत कंपन्यात लागणारा प्रशिक्षित कामगार वर्ग , तंत्रज्ञ , इंजिनियरस , डॉक्टरस आणि दूर कशाला तुमचे स्वत: चे आय ए एस झालेले पी ए अथवा सचिव  कोणत्या न कोणत्या शाळेत शिकतात कि हे ज्ञान त्यांना जन्मत:च प्राप्त असते ? तुमच्या कोणत्याही कंपनीत अथवा कारखान्यात तयार होणाऱ्या उत्पादनापेक्षा शाळांमध्ये तयार उत्पादन हे निश्चितच महत्वाचे असते. शिक्षणक्षेत्र अनुत्पादक क्षेत्र आहे इतके हास्यास्पद विधान दुसरे नसावे.

           या शाळा प्रामुख्याने खेड्यापाड्यांत ज्या गावात शाळा नाही अशा ठिकाणीच आहेत. जिथे शिक्षणाचा गंध देखील नव्हता तिथे  मागील सुमारे १० वर्षांपासून निस्पृह ज्ञानदानाचा यज्ञ या शाळांनी अव्याहत धगधगता ठेवला आहे. या शाळांमधून मागील दहा वर्षांत हजारो- लाखो विद्यार्थी विद्यार्जन करून बाहेर पडले आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावत आहेत. तथापि हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा इथला शिक्षक मात्र उपेक्षित आणि वंचित राहिला आहे. आज ग्रामीण भागात चालणार्या या शाळांमध्ये काम करणार्या शिक्षकांची मागील दहा वर्षाची मिळकत शून्य आहे म्हटल तर कदाचित अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण होय हे जळजळीत दाहक वास्तव आहे. या शाळांमध्ये या हजारो शिक्षकांना व हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ रुपयाहि मानधन दिले जात नाही. ऐन उमेदीत हि नोकरी धरली. आज न उद्या पगार चालू होईल या आशेवर दिवस रेटले. आज अनेकांचे संसार आहेत, मुलेबाळे आहेत खर्च वाढले आहेत. ३०-३५-४० वर्षे वये झाली आहेत. आईवडिलांच्या अथवा बायकांच्या जीवावर बोज बनून हे शिक्षक जगत आहेत. आणि डोळ्यांतली आशा विझत चालली आहे. उमेद आता कोसळून पडत आहे. प्रशासनावरचाच नव्हे तर या समाजावरचा, चांगल्या मुल्यावरचा देखील त्यांचा विश्वास उडत चालला आहे.

             बर ज्या शाळांमध्ये हे काम करतात त्या शाळांना धड इमारती नाहीत. पत्र्याच्या अथवा कुडाच्या खोल्यांत वर्ग भरवले जातात. अलीकडच्या- पलीकडच्या वर्गात चाललेल्या गोंधळात कंठशोष करत  शिक्षक अध्यापनाचे कार्य करत असतात. इथे नां फलक धड असतात नां कधी वेळेवर खडू उपलब्ध होतात. अध्यापनाच्या साधनाचे तर नावच नको. एकीकडे शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या गप्पा आणि दुसरीकडे हि दुरावस्था असा विरोधाभास फक्त आपल्या देशातच पाहायला मिळू शकतो. 


             पदोपदी अवहेलना, अपमान, वंचना यांना या शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे. आज ग्रामीण भागात जिथे एका स्त्री मजुराची दिवसाची मिळकत १५० रुपये व महिन्याची मिळकत ४५०० रुपये आहे आणि एका पुरुष मजुराची दिवसाची मिळकत ३५० रुपये व महिन्याची मिळकत १०५०० रुपये आहे तिथे या पदवीधर ,द्विपदवीधर शिक्षकांची दिवसाची तसेच महिन्याची मिळकत शून्य आहे. या देशात गुंजभर तरी न्याय उरला आहे कि नाही ? सर्वसामान्य लोकांना कोणी वाली उरला आहे कि नाही ? आयुष्यभराच्या निस्पृह सेवेची फळे या उत्तर आयुष्यात तरी चाखायला मिळणार कि नाही  असा आर्त सवाल या शिक्षकांच्या आयुष्याच्या फलकावर आहे ? शासनाकडे वा तथाकथित लोकप्रतिनिधींकडे याचे उत्तर आहे काय ?

                       सुहास भुसे   

उलाघाल

डोळ्यांतून ओसंडनाऱ्या चांदण्यात
स्वप्नांची क्षितिजे न्हाली..

गजर् यात माळलेली प्राजक्त फुले,
केसांच्या सुगंधात गंधित झाली..

ओठपाकळ्या  उमलल्या,
जेव्हा ती हसली..

गुलाबी गालांवर गोडशी,
मनमोहक खळी पडली..

खट्याळ नजर फेकत मजकडे,
तिने मान मुरडली..

केसांची ती अवखळ बट,
कपाळावर ढळली..

या सर्व खेळात,
तिची मात्र मजा झाली..

माझी तडफड इकडे,
अन जीवाची उलाघाल झाली...


                      
                                                  - सुहास भुसे
                        

जखम

काळ कोणासाठी थांबत नाही म्हणतात,
पण तू थांबली असतीस तर...
खर प्रेम डोळ्यांतून सांडायच असत म्हणतात,
पण तू बोलली असतीस तर...

                 कालचक्र उलटे फिरवून मी भूतकाळातील वाटांमध्ये
                 तुझ्या पाऊलखुणा शोधत असतो,
                 अनंत आठवणी, अनंत चेहरे, अनेक प्रसंग, घटना
                 हरवलेले भावविभोर क्षण वेचत बसतो

काळ सर्व जखमांवरच औषध आहे म्हणतात,
कालौघात मग माझीही जखम भरली असती तर....

                विखुरलेली भावस्पंदन वेचताना
                हृदयातील साठलेले डोह ढवळतात,
                तुझ्या स्मृती खोल डोळ्यांत दडपतो
                पण अश्रू रुपाने त्या गालावर ओघळतात

मनापासून वांछीलेले कधीतरी मिळतेच म्हणतात
माझेही मागणे मग सुफल झाले असते तर ...

                                       -सुहास भुसे
                                     

लुख्खा

तो भाबडा गरीब बिचारा
होता अजून कुंवारा
तसा चतुर अन देखणाही
तो होता जरा जरा ..

देवावर त्याची श्रद्धा
पूजाही नित्य करायचा
एकच तक्रार मात्र देवाकडे
तो रोज रोज करायचा

"ज्या बालिकांचे इतुके छान,
सुंदर सुंदर लुक्स असतात
त्यांच्या चोइसेस मात्र किती
बकवास, फालतू अन खराब असतात

तू त्यांना सौंदर्य दिलस
अक्कल द्यायला मात्र विसरला
सौंदर्य ,अकलेचे व्यस्त प्रमाण
गणितात असा कसा घसरला."

तक्रार त्याची तीतुकीच
रास्त अन खरी होती
अनुभवांचे गाठोडे मोठे
हीच त्याची शिदोरी होती

पोरींना जर अक्कल असती
त्याने हि झोडला असता पुख्खा
इतुके दिवस झुरत कशास
तो मग राहिला असता लुख्खा..


                                   -सुहास भुसे