Sunday, 16 September 2012

कळीचे फुल होताना

एक कळी, भल्या पहाटे
अलीरवाने जागी झाली
उघडताच नयन पाकळ्या
ओल्या ओल्या दवांत न्हाली

लसलसती हसती
ती मुग्धा, ती अबोली
धुंद असे स्वत:तच, अन
लाज वसे नित्य गाली

फुलपाखरे दिसता जवळी
मोहिनी ती घाबरली
शीतल येता वायूलहरी
 कामिनी ती बावरली

नवा आसमंत, नवा सुगंध
जग तिजसाठी बदलले
प्रेम दवांत न्हावून
कळीचे एका फुल झाले


            -सुहास भुसे






Wednesday, 5 September 2012

माझ्यासाठी वेड्या

माझ्यासाठी वेड्या कशास इतका तडफडतोस
मी तुझीच जाणूनही कशास अजाण बनतोस...

मी दूर आहे तुझ्यापासून फक्त शरीराने
मनात तुझ्या मी अन माझ्या अंतरी तुच वसतोस...

माझी आठवण आली तर डोळे मिटताच दिसेन
डोळे ताणून फुलाफुलात कशास मला शोधतोस...

तुझी सय कशी न येत मज, खरेच सांगते
तू दूर कुठे, तू तर माझ्याच हृदयी राहतोस...

मी स्वत: ला कधीच अर्पण केले आहे तुला
रोज देवाकडे कशास मलाच मागतोस...

तुझ्या भेटीस नसले तरी स्वप्नात येईन रोज
चंद्रात माझा चेहरा पाहात कशास उगा जागतोस...

                                            
                                              -सुहास भुसे
                                             
     

माळावरील वाटांवर


माळावरील गवतफुलांचा सुगंध हृदयात भरत
मंद मंद सा वारा वाहत होता
वाकुड्या वळणाच्या वाटांवरुन तिच्या साथीन
तो मनरमणा चालत होता
..
त्यांच्या भावना , त्यांचा उत्साह 
त्या वाटा-वाटांवरुन दौडत होता
पहिल्या वाहिल्या नवथर प्रेमाचा प्रपात
दोघांच्या डोळ्यांतून बरसत होता
..
हृदयातील मुक्या भावना
शब्दात सांडायच्या होत्या
ओसंडणा-या प्रेमाच्या खिडक्या
मोकळ्या करायच्या होत्या
..
दोघांत त्या सुरवात कोण करणार पण
अनामिक भीतीच्या छायेत दोघेजण
..
ती अबोली, लाज तिच्या गाली
तिची मुग्धता ती सोडेना
तोही वेडा होता बोलघेवडा
शब्द पण त्याच्याही तोंडून फुटेना
..
त्याने अनेकदा केलेल्या नमस्कारांना जागून
अखेर तो गजाननच मदतीला धावला
त्याच्या पवित्र प्रेमाची लाज राखून
तो त्याच्या नवसाला पावला
..
त्याचं मंदिरात दोघे
नतमस्तक झाले
डोळे मिटून देवाकडे
त्यांनी एकमेकानाच मागीतले
..
मंदिराच्या पायरीवर तिचा हात हाती धरून
तु काय मागितले ? त्याने विचारले
तिने लाजून अंतरी मोहरून
त्याच्या डोळ्यात पाहिले
..
तिच्या डोळ्यात उमटलेला तिचा चेहरा
त्याला न सांगता उत्तर मिळाले
सुरवात अशी झाल्यावर मात्र
त्यांना बोलायला रानच मोकळे मिळाले
..
त्याचा शब्द शब्द होता प्रेमान ओथंबलेला
तिचा अणुरेणु त्यात न्हाऊन निघाला
तिच्या थरथरत्या स्पर्शाने
तोही पुलकित झाला
..
मूक प्रेमिकांचा देवाच्या दारात त्या
संवाद मग खूप रंगला
अव्यक्त प्रेमाचा प्रेमग्रंथ त्यांचा
अखेर सुफळ संपूर्ण झाला




-सुहास भुसे






धमालपुरची शाळा भाग- ३

धमालपुरची शाळा भाग- ३


राम राम गावकरी मंडळी ..
आमचे इद्यार्थी इतके करामती आणि डांबरट असतात की या गावचे नाव धमालपूर ऐवजी डांबरटवाडी असायला हव होत अस वाटत कधी कधी
असो
तर आज मी तुम्हाला ज्या इद्यार्थ्याचे गुण(?)वर्णन सांगणार आहे तो इद्यार्थी म्हणजे

योगेश देवकर

हे बेण जरा विपरीत बुद्धी असणार होत ..

याला ५वित प्रवेश देताना याच्या प्राथमिकच्या बाईंनी दिलेला फोटो सोबत जोडत आहे.यावरूनच आपल्याला कल्पना येईल हे पात्र किती पहुची हुई चीज असेल याची.
याला अभ्यासा पेक्षा कोणाचे कोणाशी समीकरण जुळले आहे आणि कोणाचा कोणाशी सिग्मा बोंड आहे ....कुणाला कोणाने अचूक भाग जाईल अशाच गोष्टींत जास्त रस होता .
त्यातूनच त्याला पुढे विज्ञानाची आवड निर्माण होऊन बेण डाक्टर झाल


याचा एक वर्गातला किस्सा पहा


गुरुजी  : पोरांनो,सांगा 80+90 किती???
योगेश  : 100......
गुरुजी  : येडया... 80+90=170......
...
योगेश  : ओ मास्तर काहि पण
         शिकवू नका,लहानपणापासून आम्ही ऐकले आहे,
.
.
         "अक्कड-बक्कड बंबे बो....80-90पुरे 100(सौ)





  


आमच्या शाळेत दहावी पास होऊन हे कार्ट पुढे कालिजात गेल.
तिथ याचा एक किस्सा मला तिथल्या एका प्रोफेसरने सांगितला.

याला एक प्रोफेसर फार छळायचा...
एकदां योगेश ने त्या
फिजिक्सच्या प्रोफेसरच्या घरी फोन केला.
त्यांच्या पत्नीने फोन
उचलला आणि म्हणाल्या,
'
गेल्या आठवड्यातच ते वारले.'
.
योगेशने  दुस-या दिवशी पुन्हा फोन केला.
प्रोफेसरच्या पत्नीने फोन उचलला आणि म्हणाल्या,
'
मी कालच सांगितलं ना की ते गेल्या आठवड्यात वारले.'
योगेशने पुन्हा तिस-या दिवशी फोन केला.
प्रोफेसरच्या पत्नीने फोन घेतला आणि म्हणाल्या,
'मी एकदा सांगितलं ना की ते वारले म्हणून,
मग पुन:पुन्हा फोन
का करतोयस?
.
योगेश  : काही नाही...
ऐकून जरा बरा वाटतं
ना, म्हणून.
 

Wednesday, 29 August 2012

जिंकतो तोच

नांगराचा फाळ निष्ठुरपणे
मातीचा उर चिरत जातो
मोकळ्या ढाकळ्या त्या तनुत
मग हिरवागार कोंब फुलतो

टाकीचे मस्तकावरील घाव
दगड किती निर्धाराने सोसतो
तुकडे कपचे पडत त्याला
ईश्वराचा  आकार येतो


अस्तित्वावर होणा-या घाल्यांनी
अभिमान राख राख होतो
त्या सत्वहीन राखेतुनच पण
फिनिक्स  नवी भरारी घेतो

नवनवे आघात पचवूनच
मनास एक कणखरपणा  येतो 
अडचणींचे डोंगर खोदुनच
मनगटात नवा जोश येतो

या  संकटांनी मग तुही
कशाला खचून जातो
' जिंकतो तोच ' नव्या उमेदीने
काळाशी जो टक्कर देतो


            -सुहास भुसे
       







Sunday, 26 August 2012

धमालपुरची शाळा भाग-२


धमालपुरची शाळा भाग -२ 
माझ्या इद्यार्थी मित्रांनो,
या लेखमालेत आपण धमालपुरच्या शाळेतील काही नमुनेदार इद्यार्थ्यांचे मासलेवाईक किस्से पाहत आहोत..आणि आजचा आपला इद्यार्थी आहे ...
       २) विजय ढेरे.
.
       इजू बद्दल बोलावे तेवढे थोडे आहे. लहानपणापासून अभ्यास सोडून इतर अनेक गोष्टींत झळकणारे एक छंदी-फंदी व्यक्तिमत्व. कोणती विद्यार्थिनी कोठे राहते तिचा पत्ता अशा तपशीलांनी भरलेली याची वही एकदा मला सापडली तेव्हा मी याची जाम धुलाई केलि होती.
लहान असताना इजू अतिशय डेअरिंगबाज होता. पण हल्ली त्याची बायको त्याचे फार हाल करते असे ऐकून आहे. परवा शिवाजी (वाघमारे) सांगत होता विजूचा एक किस्सा.

      एकदा आपल्या दारुड्या मित्रांचे ( कोण मित्र ते सांगत नाही आपण ओळखून घ्या ) ऐकून विजुने जिवावरचे धाडस केले.
विजू(बायकोला) : काय ग ये ....फार झाल तुझ नाटक ....आजपासून तू सर्व भांडी धुवायची ..धूण धुवायचं ...उत्तम स्वयंपाक करून मला जेवायला वाढायचं ...माझ्या कपड्यांना कडक इस्त्री करून ठेवायची ...काय ग ये समजल का नाही ....आज मला योगेश देवकर च्या पार्टीला जायचं आहे ...सांग बर मग माझ्या बुटाला pa^laISa कोण करणार ..?
बायको : ते मी सांगते सर्व ...पण आधी तुम्ही पलंगाच्या बाहेर तर या

ख्या ख्या ख्या
या माझ्या हसण्यातून माझी माझ्या या माजी इद्यार्थ्याविषयीची सहानभूती जाणवलीच असेल ..

..
तर आता शाळेतला एक किस्सा सांगतो.
एकदा आमचे ग शी साहेब शाळा तपासणीला आले होते ....आले ते थेट आमच्या ५ वीच्या वर्गात ....
ग शी : विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारेन
इजू नेहमी मागच्या बाकावर बसून गोंधळ घालत असे ...आजही त्याची टंगळ मंगळ सुरूच होती ते पाहून साहेबांनी त्यालाच आधी उभे केले.
ग.शी. : ह बाळा तू मला कोणत्याही ५ प्राण्यांची नावे सांग बर .....
विजय : दोन हत्ती आणि तीन सिंह ..





       

धमालपुरची शाळा- भाग १


                    धमालपुरची शाळा- भाग १



हुश्श्य ..!!
अहो वात आणलाय या कार्ट्यांनी ...!!
आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हो ...
अहो इतके नाठाळ आणि टवाळ विद्यार्थी जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्या शाळेत नसतील.
शाळेत गुरुजींना आणि घरी पालकांना अगदी नाकी नउ आणले आहेत यांनी..
या लेखमालेतून म्हटल या पोरांचे काही नमुनेदार आणि मासलेदार किस्से तुम्हाला सांगावेत.....वाचा आणि या उनाड पोरांना कसे ताळ्यावर आणायचे याचा काही मार्ग सुचला तर आम्हाला सांगा.
..
..
१)      विध्यार्थी :- अनिल काळे .

  हा एक जुना विद्यार्थी आहे. बरीच वर्षे एकेका वर्गात काढून त्याने आपले शाळेवरचे प्रेम सिद्ध केले होते. सध्या दहावीत ५ वेळा नापास झाल्यानंतर स्वत: ची चहाची टपरी याने सुरु केलि आहे . पण त्यातला किमान ५० कप चहा तरी रोज स्वत: च पितो अशी वदंता आहे.

      याचा एक किस्सा सांगतो. अनिलला एकदा मधल्या सुट्टीत ग्राउंड वर कुल्फी विकणाऱ्या फेरीवाल्याने पकडून माझ्याकडे आणले. आता याने काय नवीन खोडी केलि म्हणून त्याच्याकडे चौकशी केलि असता त्याने जी हकीकत पुढीलप्रमाणे..

      अनिल सुट्टीत कुल्फिवाल्याकडे गेला .
      त्याने मोजून ५ कुल्फ्या खाल्ल्या.
      फेरीवाला म्हटला बर आहे.
      चांगल गिऱ्हाईक आहे.
      हातोहात चांगला धंदा झाला
      अनिल ने ऐटीत कुल्फ्या खाल्या आणि तसाच ऐटीत तो पुढे निघाला.
      त्यावर कुल्फिवाल्याने त्याला थांबवले आणि विचारले,
      अरे पैसे कोण देणार ?
      त्यावर अनिलने जे मासलेवाईक उत्तर दिले त्यावरून तुम्हाला कळेल कि आमच्या शाळेतली पोर कशी नमुनेदार आहेत ते ..

      अनिल त्याला म्हणाला,
      कसले पैसे ?
      कुल्फीवाला म्हणाला,
      अरे तू ५ कुल्फ्या खाल्या नां, त्याचे पैसे ..
      त्यावर अनिल म्हणाला ऐटीत
पैसे बैसे काही मिळणार नाहीत. माझ्या आईने सांगितलंय खायचा प्यायचा काहीही लाड चालेल पैश्याचा लाड अजिबात चालणार नाही.





धमालपुरातली पोर हुशार


धमालपूर .....
आंतरजालातील थोबाडपुस्तिकेवर आमचा चंचूप्रवेश झाला होता नुकताच तेव्हा आम्ही या गावाचे नागरिक झालो. तेव्हा नवीन होतो. हे सर्व काल्पनिक आहे याची जाणीव होती. इथ खूप वल्ली भेटल्या. अनेकांशी मैत्रीचे घट्ट धागे गुंफले गेले. या गावात आल्यावर या वैशिष्ट्यपूर्ण मंडळींच्या सहवासात वेळ कसा जातो हे कळत देखील नाही. हळू हळू हे संदर्भ बदलत गेले . हे काल्पनिक आहे हि जाणीव पुसट होत गेली. मग विजय ढेरेचा धाबा खराच वाटायला लागला. अनिल भाऊंच्या टपरीत रोज संध्याकाळी चहा प्यायला जाण्याची तल्लफ होऊ लागली. लीना, राधा चे न्याहरी ..जेवणासाठी येणारे पदार्थ देखील चाखून पहावेसे वाटू लागले.शिवाजी,  योगेश, सारंग , विश्वनाथ, ऋषिका, अपर्णा, किशा, राधा हि मंडळी खर् या आयुष्यातल्या मित्रांइतकीच जवळची वाटत आहेत.आणि आज हि स्थिती आहे कि आमचे खरे गाव औंढी कि धमालपूर या विषयी आम्ही संभ्रमात आहोत.
..
आमची हि कविता त्या धमाल गावास 
त्या धमालपुरास अर्पण.............!!
( टीप: ज्यांनी धमालपुरातली मजा अनुभवली आहे त्यांनाच या कवितेची मजा कळेल. बाकीच्यांना हि निव्वळ बडबडगीत वाटण्याचीच शक्यता आहे )

एक.... दोन.... तीन.... चार
धमालपुरातली पोर हुशार
एकापेक्षा एक नमुने त्यांचे
सांगेन तुम्हाला किस्से चार

विजय अनिल दुक्कल छान
आहेत मोठी अक्कलवान
गनिमी काव्यात यांची ख्याती
वरून मात्र सभ्य अन गरीब म्हणविती

किशाने काढले दारूचे दुकान
योगेश म्हणे एक बाटली आण
दोघेही पिऊन असतात तंग
पेशंटच यांच्या भल करो पांडुरंग

धमालपुरातला बहुरूपी गीते
बेन रोज एक नवे खाते बनविते
धमालपुरातला कृष्ण ओळखा
शिवाजीच्या मागे पोरींचा घोळका

लीनाला आवडते खाणे आणि गाणे
पोरीच्या या काही ठीक नाहीत लक्षणे
सारंग-विश्वा गप्पांना रंग आणतात 
पण आवसेला गेलेले पुनवेलाच उगवतात

उगवत्या कवयित्री अपर्णा ऋषिका
श्रोते म्हणतात यांचे माका-नाका माका-नाका
कवितांनी यांच्या झीट आणली गावाला
धडेच ते कविता म्हणायच्या नावाला

सुहास गुरुजी बिचारे साधे भोळे
वैतागून गेलेत या कार्ट्यामुळे
त्यांची न म्याडमची भिडवत असतात खाती
धमालपुरातली पोर फार करामती



                                सुहास भुसे
(२६-०८-२०१२)


Thursday, 23 August 2012

उद्वेग

कोण कोणासाठी जगत इथ
कुणाच कुणाशी निभत इथ
मग्न स्वत:तच चुर सारे
कोण कुणाला जपत इथ



वासनांचा बाजार मांडून बसलेले
प्रेमाचे लबाड पुजारी
नात्यांची वखार थाटून बसलेले
भावनांचे घाऊक व्यापारी
घ्वावे तेव्हा द्यावे ऐसा शुद्ध व्यवहार
उधार मग कोण कोणाकडे ठेवत इथ

मग्न स्वत:तच चुर सारे
कोण कुणाला जपत इथ

कोणी करत कोण भरत
कोणी विस्कटत कोण सावरत
मुखवटे आणि चेहरे यांचे द्वंद्व
कोणी फसवत कोण फसत
कोणी हरत कोण जिंकत इथ

मग्न स्वत:तच चुर सारे
कोण कुणाला जपत इथ



                                         ( सुहास भुसे )
                                        






Wednesday, 22 August 2012

चारोळ्या-३


प्राजक्त फुलांची उपमा
तुला चपलख दिलेली
माझ्या प्रेमाची उबही
तुला सहन न झालेली

मोरपीस रोजनिशीतल
 आठवणींचा दुवा आहे
 तिच्या स्मृतींचा मनात
 घुमणारा मधुर पावा आहे

भिजले तन भिजले मन
भिजले अवघे यौवन
प्रीतीच्या श्रावणात तुझ्या
चिंब चिंब झाले जीवन

कवितांचे सृजन आहे
थबथबलेल्या मनात
भावनांची शिंपण आहे
            या ब्लॉगच्या पानापानात ...




सुहास भुसे.
( २२-८-२०१२)










Monday, 20 August 2012

गल्लीतला शेर तो




गल्लीतला शेर तो
पोरांसमोर ' डिंगा '  मारायचा,
त्याची मोठी ग्यांग होती
गावातही त्याचा 'वट ' असायचा.

कोणाच्या बापाला तो
कधी नाही भ्यायचा.
संकटात, अगदी ' कोपच्यातही '
तो बेडर बिनधास्त असायचा.








एका गोड पोरीवर तो
मनापासून मरायचा.
तिला पाहताच त्याचा
हार्ट थडा थडा उडायचा.






बोलण्यात मोठा चतुर,
चर्चेतही कधी नाही हरायचा.
'ती ' समोर येताच मात्र
त-त प-प करायचा.


 तिने एक नजर फेकताच
याचा बलदंड देह थरकायचा.
गल्लीतला शेर तो
तिच्यापुढे कसा बिल्ली व्हायचा..


                                        सुहास भुसे
                                    




   

Thursday, 16 August 2012

चारोळ्या - १

अंधार दाटला आहे सर्वत्र
जीवनाचा अर्थच बदललाय तमाम
हवी आहे पुन्हा एकदा
एक नवी सुरवात, एक नवा आयाम


वसुचे चुंबन घ्याया 
रवी जरा उतरला खाली 
मावळतीवर बिंबित झाली 
धरेच्या गालावरची लाली 


तू दिलेला प्रत्येक घाव 
जिव्हारी बसला होता 
उमटलेल्या वेदनेने 
तुला दुवाच दिला होता 


चार शब्द लिहिले तुजविषयी
चार शब्द लिहिले मजविषयी
तुझे- माझे जगावेगळे प्रेम
चार ओळी त्या प्रेमाविषयी


सुहास भुसे.
(१६-०८-२०१२)